top of page
Search

अनुभव माळशिरसचा...

आमच्या सोलापूर जिल्ह्यातील तालुक्याचं गाव ,त्या गावातून एक रुग्ण बघायला जाण्याचा योग येतो .

कामले मुळे जवळजवळ शेवटच्या स्टेज ला असलेला रुग्ण आयुर्वेदाने बरा होण्यास मी साधन व निमित्तमात्र होतो आणि सुरू होते एक अनमोल नात्यांची परंपरा .


माळशिरस गाव ,अडचणीच्या वेळी अचानक स्वतःचं चालू असलेलं ऑफिस मला क्लिनिक साठी देऊ करून स्टाफ ला मदतीची सक्त सूचना देणारे ती.अण्णाकाका अर्थात कै .विष्णुपंत कुलकर्णी . दर शनिवारी सकाळी मी तिथे पोचलो की त्यांचा फोन यायचा ,आलात का ,जेवण झालं आहे ना ?संध्याकाळी 5 वाजता आवर्जून भेटायला येणार ,प्रेमाने चौकशी करणार ,काही अडचण नाही ना हे विचारून मगच निघणार .

अतिशय अकृत्रिम स्नेह कसा असावा याचं ते उत्तम उदाहरण घालून द्यायचे .अर्थात ही स्नेह परंपरा त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव ऍड .मिलिंद कुलकर्णी यांनी पण तितकीच जपली आहे हे विशेष 🙏


बरा झालेला तो रुग्ण म्हणजे त्यांचे पुतणेच(श्री .एम पी.कुलकर्णी सर)होते .ते बरे झाल्यामुळे अनेक रुग्ण त्या गावाच्या पंचक्रोशीतून येऊ लागले .म्हणून मग त्यांनीच एक दिवस माळशिरस मधेच क्लीनिकसाठी या असं नुसतं सांगून न थांबता जागा सुद्धा मोफत उपलब्ध करुन दिली.


माळशिरस मध्ये जवळपास 7 ते 8 वर्ष क्लिनिक चालवलं ,यश प्रसिद्धी खूप मिळाली .पुढे काही व्यक्तिगत अडचणी मुळे मग ते क्लिनिक स्थगित केलं पण जोडलेली नाती मात्र कायम राहिली .


काल 24 जून ,ती अण्णाकाका यांचा 13 वा स्मृतिदिन .या निमित्ताने एका ऋणातून थोडं उतराई व्हावं यासाठी दर वर्षी आम्ही त्यांच्या संस्थेने आयोजित केलेल्या मोफत आयुर्वेद चिकित्सा शिबिरात सहभागी झालो आहोत .


हे 13 वे वर्ष या उपक्रमाचे .सुरुवातीला आम्ही स्वखर्चाने औषधे देत होतो .आता त्या बरोबरच दोन वर्षे रसशाला ,पुणे हे काही औषधे मोफत देतात .मा.डॉ डोईफोडे सरांना एक कार्यक्रमात या उपक्रमविषयी सांगताच त्यांनी आवर्जून औषधे उपलब्ध करून दिली .आता या वर्षी पण औषधे उपलब्ध करून देऊन रसशाळा फाउंडेशन चे मोलाचे सहकार्य मिळाले .


या वर्षी औषधी मोफत देण्याबरोबरच वैद्य वरुण ने नवीन उपक्रम म्हणून अग्निकर्म उपचार सुरू केला .त्यातच आता आमच्या टीम मध्ये नव्या सुनबाई अर्थात वैद्य सौ.त्रिवेणी च्या रूपाने अजून एक भर पडली .आम्ही चौघांनी मिळून जवळ जवळ 140 रुग्णांची तपासणी केली व चिकित्सा दिली.

उपक्रम सुरू करताना पहिल्या वर्षी फक्त आयुर्वेद विषय होता ,हळूहळू रक्तदान शिबीर, श्रवणेंद्रिय तपासणी , हृदयरोग ,नेत्र तपासणी असे एक एक विषय जोडले गेले आहेत .

कालचा अनुभव तर अविस्मरणीय होता ,अग्निकर्म करून वेदना शमन झालेले रुग्ण जाऊन अजून इतर गरजू रुग्णांना घेऊन येत होते व वेदना कमी होण्याची अनुभूती घेत होते .

शाळेतील शिक्षक ,मुख्याध्यापक केसकर सर तसेच इतर स्टाफ अतिशय प्रेमाने आणि आत्मीयतेने मदत करत होते .


चिकित्सा नास्ति निष्फला ।

हे सूत्र किती यथार्थ आहे याचा अनुभव घेऊन तृप्ततेने परतीच्या प्रवासाला लागलो .अर्थातच पुढच्या वर्षीचे आग्रहाचे निमंत्रण घेऊनच .


©वैद्य महेश कुलकर्णी 

दि 25 जून 2024




0 views0 comments

Recent Posts

See All

Comments


bottom of page